KDMC : अनंत चतुर्दशीच्या दिवशी कल्याण डोंबिवलीत 16781 श्री गणेश मूर्तींचे विसर्जन
निर्माल्य डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर संस्थान, एमआयडीसी येथील खत प्रकल्प,उंबर्डे बायोगॅस प्रकल्प त्याचप्रमाणे कचोरे बायोगॅस प्रकल्प ,आयरे बायोगास प्रकल्प येथे पाठवण्यात आले
डोंबिवली ( शंकर जाधव )
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तीमय वातावरणात कल्याण डोंबिवली परिसरातील (KDMC) ‘ विसर्जन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत 52 (POP-46 व शाडू-5) श्री गणेश मूर्तींचे आणि विविध विसर्जन स्थळांवर पीओपीच्या 12965 श्री गणेश मूर्तींचे आणि शाडू मातीच्या 3764 अशा एकूण 16781 श्री गणेश मूर्तींचे विसर्जन आज पहाटेपर्यंत करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी निर्मल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती.महानगरपालिकेने प्रमुख विसर्जन स्थळांवर फायर ब्रिगेड, स्वयंसेवक, रबर बोट त्याचप्रमाणे महापालिकेची ॲम्बुलन्स इ. सुविधा उपलब्ध केली होती.
दुपारी महापालिका आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांनी स्वतः कल्याण डोंबिवलीतील विसर्जन स्थळांना भेटी देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. विसर्जन स्थळी जमा झालेले निर्माल्य डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर संस्थान, एमआयडीसी येथील खत प्रकल्प,उंबर्डे बायोगॅस प्रकल्प त्याचप्रमाणे कचोरे बायोगॅस प्रकल्प ,आयरे बायोगास प्रकल्प येथे पाठवण्यात आले आहे. या कामी विविध सामाजिक संस्था ,पर्यावरणप्रेमी संस्था एन एस एस चे विद्यार्थी यांचे सहकार्य महापालिकेस लाभले. अशाप्रकारे निर्माण खाडी /नदी यामध्ये निर्माल्य न टाकल्यामुळे जलस्त्रोतातील प्रदूषणात घट होण्यास मदत झाली आहे.